पणजी : यंदा महाराष्ट्रात मान्सून वेळेआधी दाखल होण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली आहे. गेल्या वर्षी 8 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. यंदा 7 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करेल, असं हवामान खात्याने म्हंटलं आहे.


मान्सूनचा केरळातील वेग पाहता, महाराष्ट्रात एक दिवसआधी म्हणजे 6 जूनला दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळमध्ये मान्सूनने दोन दिवस आधीच धडक दिली आणि आता तो गोव्यात सक्रीय होत आहे.

सध्या कारवारपर्यंतच मान्सून घुटमळला आहे. त्यामुळे आता राज्यातल्या जनतेला आणखी दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागणार आहे.

मुंबईत आज मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

सध्या महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मोठ्या प्रतीक्षेत असलेले मुंबईकर मान्सून पूर्व पावसाच्या सरींनी सुखावले आहेत. येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईत कालच्यापेक्षा आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यामुळे वैतागलेल्या मुंबईकरांना आजही पावसाचा आनंद घेता येण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात काल पाऊस झाला, मात्र नवी मुंबईकरांना फार वेळ पहिल्या पावसाचा आनंद घेता आला नाही. नवी मुंबईतील तुरळक ठिकाणीच सरी बरसल्या.