Monsoon News : मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. दक्षिणेकडून प्रवास करत मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे. नियोजित वेळेपेक्षा सहा दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रीय झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मान्सून केरळमध्ये तर 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. मान्सूनच्या अगोदरच केरळमध्ये पाऊस दाखल झाला आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणी पूरसृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. केरळवर सध्या आलेले डघ मोठ्या आकाराचे आहेत. या ढगांमुळे मोटा पाऊस पडतो, यामुळं पिकं उध्वस्त होतात. झाडे उन्मळून पडतात असे काही वैज्ञानीकांचे म्हणणे आहे. 


भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. यंदाही महाराष्ट्रात मान्सून दरवर्षीप्रमाणे पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभाग पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख अनुराग कश्यपी यांनी सांगितले. 


महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनपूर्व पावसानं  जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरी काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. पंढरपूर परिसरात वादळी वारे आणि पावसाने द्राक्ष बेदाणे शेड उध्वस्त झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. तर शेवग्याची झाडे पडली आहेत. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील शेतकरी शिवाजी हळणवर यांच्या बेदाणा शेडवरील पत्रे व कागद उडाल्याने सहा लाख रुपयांच्या तीन टन बेदाण्याचे नुकसान झाले आहे. तर पळशी‌ येथील शेतकरी शेवाळे यांची दोन‌ एकरावरील शेवग्याची बाग‌ जमिनदोस्त झाली आहे.