Devendra Fadnavis on State Govt : या सरकारमध्ये कोणीतरी शेतकर्‍यांबद्दल बोलताना तुम्ही पाहिले आहे का? 'पिकेल ते विकेल' अशी घोषणा करायची आणि प्रत्यक्षात 'पिकेल ते जळेल' असे धोरण राबवले जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडीसमोर जे प्रश्न आहेत, ते बारमालकांचे, विदेशी दारुचे दर कमी करण्याचे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांशी त्यांना काही लेनदेन नाही. शेतकरी विम्याचे पैसे भरतो. पण, त्याला पीकविमा मिळत नाही. या सरकारने 8 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला.


रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या 'जागर शेतकर्‍यांचा-आक्रोश महाराष्ट्राचा' या यात्रेच्या समारोप टेंभुर्णीत पार पडला. या कार्यक्रमात शेतकर्‍यांच्या मेळाव्याला फढणवीसांनी संबोधित केलं. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, हर्षवर्धन पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख उपस्थित होते. 




आपत्तीत सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही


10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करतात आणि 3000 कोटी पण देत नाहीत. निर्णयानंतर वर्षभर यांचे जीआर निघत नाहीत. जीआर असे काढतात की शेतकर्‍यांसाठी अडथळ्यांची शर्यत तयार होते. वादळ, गारपीट, अतिवृष्टी अशा कितीतरी आपत्ती येऊन गेल्या. पण, कवडीची मदत या सरकारने केली नसल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकरी विम्याचे पैसे भरतो. पण, त्याला पीकविमा मिळत नाही. या सरकारने 8000 कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोग लागू केला आणि शेतकर्‍यांना वाढीव हमीभाव दिला. 10 वर्ष काँग्रेसने हा अहवाल थंडबस्त्यात ठेवला. आज शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात निधी केंद्र सरकारतर्फे दिला जातो. 1.75 लाख कोटी रुपये सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले. 


महाविकास आघाडीने सार्‍याच योजना बंद केल्या


आमच्या सरकारने शेततळ्यांची योजना राबवली. गटशेतीची योजना तयार केली. यांत्रिकीकरणासाठी मदत दिली, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीने सार्‍याच योजना बंद केल्या आहेत. हे सरकार जुन्या काळातील टेलिफोनसारखे आहे. 1 रुपया टाकला, तरच हॅलो ऐकू येते, असेही फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, 'माझं कुटुंब-माझी जबाबदारी', तेव्हापासून सर्वच मंत्र्यांचा एकच कार्यक्रम सुरू आहे, 'माझं कुटुंब-माझी जबाबदारी'! या सरकारने शेतकर्‍यांची दैना केल्याचे फडणवीस म्हणाले.


उजनीचे पाणी वळवण्याचं कारस्थान


आता उजनीचे पाणी वळवण्याचे कारस्थान रचले जात आहे. कितीही पोटात गेले तरी काही लोकांची तहानच भागत नाही. सामंतशाही आणण्याचे काम काही नेते करत असल्याचे ते म्हणाले. हा फक्त यात्रेचा समारोप आहे. आंदोलनाचा समारोप नाही. तर शेतकर्‍यांना जोवर न्याय मिळत नाही, तोवर आपला लढा, संघर्ष असाच सुरु राहील असेही फडणवीस यावेळी म्हणाले.