Monsoon Update : उष्णतेनं हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात आणि गोव्यात दाखल झालाय. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला आहे. बिपारजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पश्चिमी किनारपट्टी भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण झालेय. पुढील 48 तासात मान्सून पुढे सरकत मुंबईत दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालेय. राज्यात पुढील चार ते 5 दिवस मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाने आज ही माहिती दिली आहे.
नैऋत्य मान्सूनचे आज 11 जूनला महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, द.मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटकचा व तामिळनाडू व आंध्रप्रदेशचा काही भाग व्यापला आहे. त्यामुळे राज्यात पुढच्या 4,5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवमान विभागाने दिली आहे. रत्नागिरी, नशिक, रायगड, पालघर, औरंगाबाद, सोलापूर, सांगलीसह राज्यातील अनेक शहरात पावसाची शक्यता आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण कर्नाटक, आंध्र प्रदेशचा अधिक भाग आणि पश्चिम बंगालच्या उपसागराच्या अधिक भागांमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. यावेळी ढगाळ वातावरण असेल. तर वादळी वाऱ्यासह काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अनेक भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईसह उपनगरातही मान्सूपूर्व पाऊस झाला. महाराष्ट्रात नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर यासह इतरही अनेक जिल्ह्यात शनिवारी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली.
बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलला
बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पश्चिमी किनारपट्टी भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. बिपरजॉयने चक्रीवादळाने मार्ग बदलला आहे. गेल्या 12 तासांमध्ये चक्रीवादळ हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकत आहे. चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता याआधी हवामान खात्याने वर्तवली होती.
महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता नाही
भारतीय हवामान विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 12 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किंवा गुजरातच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता नाही. पण या भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चक्रीवादळ गुजरातच्या पोरबंदर किनारपट्टीपासून 200 ते 300 किलोमीटर अंतरावरून पुढे सरकणार असल्याची शक्यता आहे.