लोणावळा : लोणावळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र योगी आदित्यनाथ मंचावर येण्यापूर्वी एका माकडाने उपस्थिती लावली. हे माकड माईकचा ताबा हातात घेण्याच्या तयारीत होते.


भेगडेंच्या सभेत मावळ तालुक्यातील आरपीआयचे नेते सूर्यकांत वाघमारे हे भाषण करत होते. त्याचवेळी या माकडाची एंट्री झाली. राज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांच्यावर प्राणी ही किती प्रेम करतात हे माकडाच्या उपस्थितीने स्पष्ट झाला, असा डायलॉग यावेळी वाघमारेंनी मारला. आता विरोधक म्हणतील या माकडाला 50 हजार रुपये देऊन आणलं असेल, असंही ते म्हणाले.

भाषण सुरु असतानाच हे माकड थेट वाघमारेंच्या दिशेने गेलं आणि थेट माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा मंचावरील एका सुरक्षा रक्षकाने माकडाला हुसकवण्यासाठी बंदूकच रोखली. तरीही माकड मंडपातून हलायचं नाव घेत नव्हतं. शेवटी पोलिसांनी मंचालगतचे कापड फाडून त्या माकडाला हुसकावून लावले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत योगी आदित्यनाथ मंचावर पोहोचले.