Money Laundering Case : राज्यातील सत्तांतरानंतर आता पुन्हा एकदा ईडीची धार विरोधी पक्षांच्याविरोधात तीव्र होताना पाहायला मिळत आहे. कारण नुकतंच ईडी (Enforcement Directorate, ED) कार्यालयाकडून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल ( PRAFUL PATEL) यांच्या वरळीतील घरावर कब्जा करण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे, निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. 


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वरळीस्थित सीजे हाऊस बिल्डिगमधील एक फ्लॅट ईडीकडून सध्या सील करण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार इक्बाल कासरकर (Underworld gangster Iqbal Mirchi case) प्रकरणात पैशांच्या देवाणघेवाणीत मनी लाँड्रींग झाल्याचा संशय ईडीला आहे. खरतर सीजे हाऊस मधील प्रफुल पटेल यांच्या मालकिचे दोन फ्लॅट याआधीच ईडीकडून जप्त करण्यात आले होते. त्यातील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ईडीने आपलं नवं आँफिस देखील सुरु केलं आहे. तर आता याच बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यावर पटेल राहत असलेल्या फ्लॅटवर ईडीकडून टाच आणण्यात आली आहे.


नेमकं प्रकरण काय आहे? 
वरळी येथील सीजे हाऊसच्या जागी पुर्वी एक छोटी इमारत होती. त्यावर इक्बाल मिर्ची याचा ताबा होता. ज्यावेळी याठिकाणी पुनर्बांधणीचा मुद्दा आला त्यावेळी याचं काम पटेल यांच्या कंपनीने केलं. पटेल यांच्याकडून यासाठी मिर्ची आणि त्याच्या कुटुंबाला रोख रक्कम आणि काही जागा देण्यात आली. याच व्यवहारत गैरप्रकार झाल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून दोनवेळा चौकशी झाली आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये ईडीने प्रफुल्ल पटेल यांनी 12 तास चौकशी केली होती.  दोनवेळा केलेल्या चौकशीनंतर ईडीने जो तपास केला. त्यानंतर पटेल यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. 


पुन्हा एकदा राष्ट्रवादी रडारावर?
या संपुर्ण प्रकरणी सत्ताधारी पक्ष विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी अशाप्रकारच्या कारवाया करत असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून होत आहे. तर सत्ताधारी पक्षाकडून कर नाही त्याला डर कशाला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. राजकिय वर्तुळात आता राष्ट्रवादीचा तिसरा वरिष्ठ नेता ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. याआधी अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. नुकतेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या ईडीच्या चौकशीला सामोऱ्या जाऊन आल्या आहेत. त्यांना पुन्हा एकदा सोमवारी चौकशीला सामोरे जावे लागणार आहे तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांच्यावर करण्यात आलेल्या जप्तीच्या कारवाईमुळे केंद्रीय यंत्रणांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे तर मोर्चा वळवला नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.