राष्ट्रवादीच्या संस्थापक नेत्यांपैकी विजयसिंह मोहिते पाटील एक जेष्ठ नेते आहेत. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे वजनदार नेते म्हणून ते ओळखले जातात. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वाधिक 23 जागा असूनही उमेदवार का दिला नाही, असा सवाल विजयसिंह मोहिते पाटील यांचे धाकटे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली. मात्र राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी या निवडणुकीकडे पाठ का फिरवली, असा सवाल जयसिंह मोहिते पाटील यांनी केला.
भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे लहान बंधू संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळी माढ्यातील राष्ट्रवादीचे 5 आणि काँग्रेसचे 7 सदस्य उघडपणे भाजप उमेदवाराला मतदान करत होते.
पक्षविरोधी मतदान केल्याने सदस्यांवर कारवाई केली जाऊ शकते. मात्र या सदस्यांना राष्ट्रवादीकडून अभय देण्यात आलं आहे. पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार होणारी कारवाई टाळण्यासाठी राष्ट्रवादीने अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचं कारस्थान केलं. म्हणून आपल्या गटाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य राजीनामा देतील, असं जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान विजयसिंह मोहिते यांनाही खासदारकीचा राजीनामा देण्याचा आग्रह करणार असल्याचं जयसिंह मोहिते पाटलांनी सांगितलं. पक्ष सोडल्यानंतर कोणत्या पक्षात जायचं त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.