यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विदर्भ आणि खान्देशमध्ये नरेंद्र मोदींच्या हस्ते आज विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहेत. मात्र नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात विरोध होताना दिसत आहे.
यवतमाळमधील पांढरकवडा येथे मोदींविरोधात बॅनरबाजी करण्यात आली. 'मोदी गो बॅक'चे बॅनर्स पांडरकवडा येथे लावण्यात आले आहेत. पांढरकवडा कोंगरा मार्गावर मोदींविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
मोदींविरोधात बॅनर्स लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी फलक हटविल्याची माहिती समोर येत आहे. युवक काँग्रेसने हे पोस्टर लावल्याची माहिती मिळत आहे.
यवतमाळमधील नरेंद्र मोदींचे नियोजित कार्यक्रम
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या निवडक लाभार्थींच्या ई-गृहप्रवेशासाठी पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना घराच्या चाव्या प्रदान करण्यात येतील.
- अजनी-पुणेदरम्यान धावणाऱ्या या गाडीला व्हिडिओ लिंकद्वारे पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील.
- केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमीपूजन पंतप्रधान बटण दाबून करणार आहेत.
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता गटांना पंतप्रधानांच्या हस्ते प्रशस्तीपत्र/धनादेश प्रदान केले जातील. वित्तीय समावेशकतेच्या उद्देशाबरोबरच सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी हे अभियान काम करते. यामुळे घरोघरी वित्तीय सेवांच्या माध्यमातून कृषक आणि अकृषक उपजीविका संधी सुनिश्चित करण्यासाठी मदत मिळते.
या वेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित असतील.