मुंबई : इंग्रजांविरोधात लढताना प्राणाची आहुती देणारे शहीद राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, असा खळबळजनक दावा संघाचे माजी प्रचारक आणि पत्रकार नरेंद्र सेहगल यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. सँडर्सच्या हत्येनंतर शहीद राजगुरु हे नागपुरातील संघ मुख्यालयात येऊन गेले होते, असंही त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.


‘भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता’ या पुस्तकाच्या आधारे सहगल यांनी संघ देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचे वाटप आता संघाच्या स्वयंसेवकांमध्ये केले जात आहे.

पुस्तकात काय दावे करण्यात आले आहेत?

- राजगुरु हे संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे निकटवर्तीय होते.

- राजगुरु हे नागपूरच्या मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक होते.

- इंग्रज पोलीस अधिकारी सँडर्सला गोळ्या घातल्यावर ते लाहोर सोडून पळाले.

- नागपुरात येऊन राजगुरु डॉक्टर हेडगेवारांना भेटले.

- डॉक्टर हेडगेवारांनी त्यांची राहण्या-खाण्याची सोय भैय्याजी दनः यांच्या घरात केली.

एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सातत्याने आपल्या भाषणातून म्हणत आहेत की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कुठल्यात प्रकारे सहभाग नव्हता, तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक राहिलेल्या स्वयंसेवकाकडून राजगुरु संघाचे होते असा दावा केला जात आहे. त्यामुळे आता राहुल गांधी आणि एकूणच विरोधक काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.