MNS Celebration Shivjayanti 2022 : 19 फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाल्यानंतर आता उद्या अर्थात 21 मार्च रोजी शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी केली जाणार आहे. दरम्यान राज्यभरातील शिवभक्तांचा उत्साह अगदी गगनात मावेनासा झाला आहे. अशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी प्रमाणे राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जोरदार साजरी होणार असल्याचं सांगण्यात आलं असून अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यावेळी छत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत.


सर्वात आधी उद्या सकाळी 6.30 वाजता महाराजांचे  जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे हे अभिषेक आणि पूजन करणार आहेत. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी  करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सरचिटणीस शालीनी ठाकरे यांनी केले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने ढोलताशांच्या गजरात हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थ, दादर परीसरात होणार आहे.


अभिजित पानसे आणि सचिन मोरे करणार पुष्पवृष्टी


हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी पक्षाचे नेते अभिजित पानसे आणि सचिव सचिन मोरे हे करतील अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अमेय खोपकर यांनी दिली. या सोहळ्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त, मनसेचे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील असा विश्वास अमेय खोपकर यांनी व्यक्त केला आहे.


हे ही वाचा-



 LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha