Raj Thackeray : आमदार मुक्ता टिळक  (Kasba Bypoll Election) आणि आमदार लक्ष्मण जगताप  (Chinchwad Bypoll Election) यांच्या निधनानंतर पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यातच मनसे राज ठाकरेंनी (Raj Thackeray)ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन सर्वपक्षीयांना केलं आहे. फेसबुक पोस्टद्वारे राज ठाकरेंनी हे आवाहन केलं आहे. 


कसबा मतदार संघात हेमंत रासने आणि चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यंतची परंपरा पाहता लोकप्रतिनिधींचं निधन झालं की, त्या मतदार संघात निवडणूक बिनविरोध होते. त्यामुळे या दोन्ही मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत जो उमदेपणा भाजपनं दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी  दाखवावा, असंही त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या पत्रात लिहिलं आहे.


पत्रात नेमकं काय लिहिलं आहे?


महाराष्ट्र विधानसभेच्या 2 आमदारांच नुकतंच दुखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं, तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही, असंही त्यांनी पत्रात स्पष्ट लिहिलं आहे. 


अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली, असं म्हणत त्यांनी सर्वपक्षीयांना अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळची आठवण करुन दिली. 


आता पुन्हा पिंपरी -चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 


 



निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा : दीपक केसरकर


निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा , असं आवाहन शिंदे गटाने नेते दीपक केसरकर यांनी केलं आहे. ते म्हणाले की मागील काही वेळी निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा खंडित झाली होती त्यावेळी पवारांनीच पुढाकार घेतला होता. यावेळीदेखील ते पुढाकार घेऊन निवडणूक बिनविरोध होऊ देतील, अशी मला खात्री आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sanjay Raut : पोटनिवडणुका होणारच, महाविकास आघाडीच जिंकणार; संजय राऊतांनी थेटच सांगितलं