औरंगाबाद : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा भडका उडाला आहे. काल काँग्रेससह विरोधकांनी ‘भारत बंद’ केल्यानंतर आजही मनसेने औरंगाबादेत आंदोलन केले. मनसेच्या विद्यार्थी सेनेने औरंगाबादेत अनोखं आंदोलन केलं.

इंधन दरवाढीविरोधात औरंगाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दुचाकीला फाशी देत आंदोलन केलं. इंधन दरवाढीने विद्यार्थ्यांकडे गाडी असून देखील त्यात पेट्रोल टाकणे आवाक्याच्या बाहेर गेल्याने आता दुचाकी शोभेची वस्तू झाल्याने तिला फाशी देण्याची वेळ आल्याचा आरोप करत मनसे विद्यार्थी सेनेने हे आंदोलन केलं.

औरंगाबादमधील क्रांती चौक भागात दुचाकीला फाशी देत सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. सरकारने इंधनाचे दर नियंत्रणात आणले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

दरम्यान, कालच काँग्रेसने ‘भारत बंद’ केला होता. यात महाराष्ट्रात मनसेनेही सहभाग नोंदवला होता. देशभरात विविध ठिकाणी कालही व्यवहार बंद ठेवून, निदर्शनं करण्यात आली.