कल्याण-डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा चक्की नाका ते नेवाळी दरम्यानच्या रस्त्याची आज मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.यावेळी राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांवर जाब विचारत 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला.आता सहनशीलतेचा अंत झालाय,15 दिवसात खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भराव लागेल असा इशारा आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना दिला आहे.
यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासनावर टीका करत टक्केवारीमध्ये सगळं अडकलय. सत्ताधारी वाघाचा वाटा खातायत ,अधिकारी ठेकेदारावर कारवाई करून काय होणार? वाघाचा वाटा जातो कुणाकडे असा सवाल केला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अंतर्गत तसच डांबरी रस्त्याची यंदाच्या पावसाळयात दुरावस्था झाली. काही रस्त्यावर तर जणू खड्ड्याची स्पर्धा लागली काय असे चित्र दिसून येत आहे. महापालिकेने गेल्या आठ वर्षात तब्बल 114 कोटी खड्डे भरण्यासाठी खर्च केले आहेत. मात्र अद्यापही या रस्त्यांची परिस्थिती जैसे थे तशीच आहे.
यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने बारा कोटीच्या निविदा काढल्या होत्या. यंदा पावसाळ्यातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र हे खड्डे भरण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. तक्रारी निवेदने आंदोलनं करून देखील प्रशासन दाद देत नसल्याने आज मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांची पाहणी केली . कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका ते नेवाळी दरम्यानच्या रस्त्याची पाहणी करताना आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत आगपाखड केली.
यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सत्ताधारी शिवसेना व कल्याण डोंबिवली महापालिकेवर टीका केली. रस्त्याची अत्यंत खराब अवस्था आहे. अनेक महिन्यांपासून रस्त्यांबाबत पाठपुरावा करत होतो. मात्र प्रशासनाने लक्ष दिले नाही त्यामुळे आज दौरा काढला. या रस्त्याचे तर 95 टक्के बिलिंग झाले मात्र त्या प्रमाणात काम झालेले नाही. मुंबईत ब्लॅकलिस्ट केलेल्या ठेकेदाराला या रस्त्याचं काम दिलं,सत्ताधारी सिंहाचा नव्हे तर वाघाचा वाटा खातात त्यामुळेच या रस्त्यांची अशी अवस्था झाली अशी टीका केली.
पुढे बोलताना पाटील यांनी या रस्त्यांवर लोक मरतात पालकमंत्र्यांनी एकदा तरी या रस्त्याची पाहणी करावी. महापालिका आयुक्त कलेक्टर मोडवरून आयुक्त मोडवर आलेले नाहीत. खुर्च्या उबवायला बसलेत कोणतेही काम करत नाही. या दौऱ्याला अधिकारी आजारी असल्याचे कारण देत आले नाही ,जबाबदारी एकमेकांवर ढकलून तर सत्ताधारी आणि प्रशासन आणि रस्त्यांची वाट लावून ठेवली आहे .आठ वर्षात 114 कोटी खर्च झालाय तो दिसतो का? सगळीकडे अडवणूक आणि फसवणूक सुरू आहे. ओरबडण्याचे काम सुरू आहे ,अधिकाऱ्यांवर ठेकेदारांवर कारवाई करून काय फरक पडतो वाघाचा वाटा कुणाकडे जातो ते पहा.... आता सहनशिलतेला अंत झालाय ,15 दिवसात खड्डे भरा अन्यथा यांना याच खड्ड्यात भरु असा इशारा दिला आहे.