Raj Thackeray Letter on Loudspeaker : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात घेतलेली भूमिका महाराष्ट्रात राजकीय तापमान वाढवताना दिसत आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेकडे साऱ्यांचंच लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात पुन्हा रान पेटवण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी एक पत्र या बाबत लिहीलं आहे. हे पत्र नागरिकांना घराघरात जाऊन देण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकाना केलं आहे. मात्र हे पत्र वाटप करणाऱ्या मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.


 भोंग्याबाबत जनजागृती करणारं पत्र राज ठाकरे यांनी काढलं असून ते नागरिकांपर्यंत घरोघरी पोचविण्याचं आवाहन मनसे कार्यकर्ते यांना केलं आहे. घाटकोपरच्या असल्फा विभागात मनसेचे उपाध्यक्ष महेंद्र भानुशाली, शाखा अध्यक्ष राहुल चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या पत्रांचे प्रथम मंदिरात पूजन केले. मात्र ते वाटप करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र आपण हे पत्र घराघरांत पोहचविणारच असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसैनिकांनी माहीम येथील मकरंद सोसायटीपासून मुंबईत हे पत्र नागरिकांच्या घरोघरी जाऊन वाटपास सुरुवात करण्यात आली आहे.


यानुसार नवी मुंबईतील सिवूड येथे मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी पत्राचं वाटप सुरू केलं. त्यांनी सोसायटीमध्ये जाऊन मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील मनसेकडील भोंगे विरोधी पत्राचं वाटप केलं. मनसेमुळे महाराष्ट्र आणि देशभरात भोंग्याच्या आवाजाविरोधात चळवळ सुरू झाली असून यामध्ये आता सर्वसामान्य नागरिकांनीही उतरावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केलं आहे.


पाहा व्हिडीओ : राज ठाकरे यांची सूचना जनता ऐकणार? लाऊडस्पीकर संदर्भात पोलिसांकडे जाण्याचं आवाहन



दरम्यान पोलिसांनी चेंबूरमधून काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. चेंबूरमध्ये काही मनसे कार्यकर्ते नागरिकांच्या घरोघरी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्राचं वाटप करत होते. यावेळी या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मनसे कार्यकर्त्यांना आरसीएफ पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे. विना परवानगी पत्र वाटप केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ मनसैनिकांना ताब्यात घेतलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या