औरंगाबाद : औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीमुळे विप्रोने तब्बल अडीच हजार कोटींची गुंतवणूक रद्द केली, असा गौप्यास्फोट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जाहीर सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.

काही वर्तमानपत्र आणि काही चॅनल केवळ सरकारवर टीका करतात, यात एबीपी माझाचा समावेश आहे, असं सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत. राज ठाकरेंनी यावेळी राम मंदिर, ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं.

अमूलसाठीसाठी राज्यातील दूध आंदोलनाकडे दुर्लक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दूध दर आंदोलनचा आज चौथा दिवस आहे. यावर अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने राज ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकार आपलं राज्य सरकार आणि मंत्र्यांना हाकत आहे. गुजरातमधील अमूल दुधासाठी राज्य सरकार दूध आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला.

राम मंदिर आताच का आठवलं?
भाजपकडे चार वर्षांपूर्वी बहुमत होतं. पण आताच राम मंदिर का आठवलं, असा प्रश्न विचारताना राज ठाकरे म्हणाले की, निवडणूक जिकणं कठीण असल्याचं लक्षात येताच भाजप राम मंदिराचा मुद्दा पुढे करत आहे. तसंच राम मंदिरच्या नावाने दंगल घडवून हिंदू मत एकवटून निवडणूक जिकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही ते म्हणाले

भाजप पैसे-ईव्हीएमच्या जोरावर निवडणूक जिंकते
भाजपकडे स्वतःचे उमेदवार नाहीत, ते दुसऱ्या पक्षातील लोक शोधत फिरतात. पक्षात दुसऱ्या पक्षाचे लोक घेऊन, पैसे आणि ईव्हीएमच्या जोरावर निवडणूक जिंकतात. ईव्हीएम बंद करा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. भाजपकडे हजारो कोटी रुपये कुठून येतात, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

डॉक्टर, इंजिनिअरना पक्षात संधी देणार
महाराष्ट्रमधील तरुण नोकरी शोधत आहेत मात्र बाहेरुन आलेले नोकऱ्या घेऊन जात आहे. बाहेरुन येणाऱ्या लोकांना पोसण्यासाठी सरकार खर्च करत असल्याने सरकारचे पैसे जनतेपर्यंत येत नाहीत. डॉक्टर, इंजिनिअर, अशा तरुण मुलांना मी पक्षात संधी देणार आहे, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.

आधीचं सरकार आताच्या सरकारपेक्षा बरं होतं. तस थापड्या शिवसेना आणि भाजपापेक्षा काँग्रेस बरी आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.