Raj Thackeray:  निवडणूका आल्या की नाक्यावर सभा घेणारी ही माणसं असून त्यांचे अस्तित्व नरेंद्र मोदी यांच्यावर अवलंबून असल्याची बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलेल्या टीकेवर त्यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांनी कर्नाटकमध्ये (Karnataka) काँग्रेसला (Congress) मिळालेल्या यशात 'भारत जोडो' यात्रेचा मोठा प्रभाव असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शेलार यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती.


कल्याणमध्ये संघटनात्मक बैठकीसाठी राज ठाकरे आले होते. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राज यांना आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे यांनी म्हटले की, कितीही मोठा विरोधी असला तरीदेखील विरोधकांच्या काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. 'भारत जोडो' यात्रेचा परिणाम कर्नाटक निवडणुकीत दिसून हे मान्य करावं लागेल. या पराभवातून बोध घ्यावा लागेल. जर त्यातून बोध घ्यायचा नसेल तर त्यांनी आपलं सुरूच ठेवावं असं त्यांनी म्हटले. मुळात यांचं अस्तित्व हे नरेंद्र मोदींमुळे आहे. यांना खाली कोण ओळखतं, ह्यांचे अस्तित्व मोदींवर अवलंबून आहे. ही लहान माणसं आहेत, असा सणसणीत टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. 


आशिष शेलार यांनी काय म्हटले होते?


कर्नाटक निवडणुकीवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. घरात बसून स्वप्न पाहिल्यावर स्वप्नातल्या प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो असा टोला शेलार यांनी ठाकरे यांना लगावला. आशिष शेलार यांनी म्हटले की, जालंधरमध्ये आप का जिंकली आणि काँग्रेसचा पराभव का झाला, त्या ठिकाणी 'भारत जोडो' यात्रेचा परिणाम नाही झाला का? उत्तर प्रदेशातील महापालिका, नगरपालिकामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा चालली नाही का, असा प्रश्न त्यांनी केला.  मी जिवंत आहे हे दाखवण्यासाठी राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली, असे शेलार यांनी म्हटले. 


राज ठाकरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली?


अंबरनाथमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले होते की, आपलं कोण वाकडं करु शकतो? अशा प्रवृत्तीचा पराभव आहे. जनतेला कधीही गृहीत धरू नका, हा त्यातील बोध आहे. सर्वांनीच त्यातून बोध घ्यावा,' असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. कर्नाटकाच्या विजयात भारत जोडो यात्रेचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतो. तुमच्या मालकांनी बातम्या दाबल्या तरीही भारत जोडो यात्रेचा प्रभाव दिसतोय. तुम्ही कितीही नाकारलं तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. 


Raj Thackeray on Karnataka Result : पराभवातून बोध घ्यायचचाच नसेल तर.... शेलार, फडणवीसांवर हल्लाबोल