मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेले अनेक दिवस विविध घडामेडी घडत आहेत. सत्तास्थापना, त्यानंतरचं नाराजीनाट्य अशा अनेक घडामोडींनंतर आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडण्याची शक्यता आहे. कारण झेंडा भगवा करुन हिंदुत्ववादाची कास धरण्याचा प्रयत्न करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात भाजपसोबत जाऊ शकते, असं खळबळजनक विधान मनसेचे दिग्गज नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भविष्यात कोणत्याही पक्षासोबत राजकीय समिकरणे जुळू शकतात, असं विधान केलं आहे. नांदगावकरांच्या या विधानानंतर मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येणार की काय? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.


शिवसेना धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत गेलेली असल्याने हिंदुत्ववादी पोकळी भरुन काढण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठीच मनसे आता हिंदुत्वाचा विचार करत भगवा रंग धारण करणार आहे. मोदी-शाहांना राजकीय क्षितीजावर दिसून देऊ नका, असं म्हणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांचीच साथ घेणार का, असा सवालही उपस्थित होतोय. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात भाजपसोबतही जाऊ शकते असं विधान मनसेचे दिग्गज नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात मनसेचा झेंडा बदलणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.


मनसेचा नवीन झेंडा असा असण्याची शक्यता


राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भगवी होणार असल्याची चर्चा आहे. कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा तब्बल 14 वर्षांनी बदलण्याची शक्यता आहे. मनसेच्या झेंड्यात मध्यभागी भगवा (अधिक प्रमाणात) तर वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूस हिरवा रंग आहे. मनसेचा हा झेंडा आता बदलणार आहे. मनसेचा नवा झेंडा हा संपूर्णपणे भगवा असेल, अशी माहिती मिळाली आहे. झेंड्यात आता दुसऱ्या कोणत्याही रंगाचा समावेश नसेल. विशेष म्हणजे या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल. नव्या झेंड्यामध्ये मनसेचं निवडणूक चिन्हदेखील (रेल्वेचे इंजिन) नसेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.


मनसेच्या या नव्या झेंड्याचं रुप पाहिलं, तर मनसे पूर्णपणे हिंदुत्वाच्या मार्गावर राहणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. भगवा रंग आणि शिवरायांची राजमुद्रा त्याचेच संकेत देत आहेत. कदाचित शिवसेना ही धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत सत्तेत गेल्याने हिंदुत्त्ववादी मतांना आकर्षित करण्यासाठी आणि शिवसेनेची कट्टर हिंदुत्वाची जागा भरुन काढण्यासाठी हा बदल केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सध्याच्या मनसेच्या झेंड्याच्या रंगांमध्ये पक्षाची सर्वसमावेशकता दडली होती. पण सध्याच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात एकगठ्ठा मतदानाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना ही आघाडीच्या वळचणीला गेल्याने कट्टर हिंदुत्ववादी मतदारांना पर्याय हवा आहे. तोच पर्याय बनण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत का? हे 23 तारखेलाच कळेल, कारण 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी मनसे त्यांच्या नव्या झेंड्याचे अनावरण करणार असल्याचे बोलले जात आहे.


संबंधित बातम्या : 


मनसेच्या राजकारणाची दिशा बदलणार, पक्षाचा झेंडा भगव्या रंगात रंगणार?


राज्यात केंद्राच्या धर्तीवर सात नवीन मंत्रालयं, प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन


अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन, मुख्यमंत्र्यांसमोर हातात हात