मुंबई: मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण मी भिकारी होणार नाही, असं वक्तव्य करुन वादाच्या केंद्रस्थानी आलेले, शिवसेनेचे यवतमाळचे विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. मात्र असं वक्तव्य करण्याचं धाडसं तानाजी सावंत यांना झालंच कसं असा प्रश्न विचारला जात आहे.

तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केलं. एकवेळ मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण मी भिकारी होणार नाही, असं वक्तव्य सावंत यांनी केल्याचा दावा एका व्हिडीओ क्लिपद्वारे करण्यात येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोण आहेत तानाजी सावंत?

  • सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकावचे रहिवाशी

  • त्यांचं शिक्षण पुण्यात झालं.

  • पुण्यात जेएसपीएम नावांनी चार शैक्षणीक संकुल

  • चार खाजगी साखर कारखान्याचे मालक

  • उस्मानाबाद जिल्ह्यात सोनारी इथे खाजगी कारखाना.

  • त्यांनी उस्मानाबादच्या वाशी सह. कारखाना चालवायला घेतला आहे.

  • सोलापर जिल्ह्यात लुंगी आणि विहाळ इथेही कारखाना

  • वर्षभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश. त्यांचे भाऊ शिवाजी सावंत सोलापूर जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे सदस्य होते.

  • पक्षात येताच शिवसेनेनं यवतमाळ इथून विधानपरिषदेची उमेदवारी दिली


 तानाजी सावंत यांची संपत्ती

निवडणुकीच्या शपथपत्रात तानाजी सावंत यांनी 115 कोटीची संपत्ती जाहीर केली आहे. सर्वाधिक संपत्ती जाहीर केलेल्या पहिल्या तीन आमदारांमध्ये तानाजी सावंत यांचा नंबर आहे.

जंगम - 72 कोटी 40 लाख 55 हजार 644

स्थावर - 43 कोटी 5 लाख

एकूण - 115 कोटी 45 लाख 55 हजार 644

तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया

दरम्यान, याप्रकऱणी एबीपी माझाने आमदार तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले,

"या व्हिडीओमध्ये मोडतोड करण्यात आली आहे. व्हिडीओतील एखादं वाक्य दाखवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण भाषण ऐकल्याशिवाय माझ्या म्हणण्याचा अर्थ लागणार नाही. मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तरीही  माझ्यामुळे महाराष्ट्राची भावना दुखावली असेल तर मी बिनशर्त माफी मागतो", असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.


संबंधित बातम्या


मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, शिवसेना आमदाराचंही आक्षेपार्ह वक्तव्य