सातारा : कराड जिल्हा न्यायालयाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत यांची 2012 मधील आंदोलनाप्रकरणी दाखल दोन खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याप्रकरणी गुरुवारी निकाल लागला. 2012 मध्ये ऊस दरासाठी हे आंदोलन केलं गेलं होतं, पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना हे आंदोलन झालं होतं. कराड पोलीस ठाण्यामध्ये या आंदोलनाप्रकरणी 47 गुन्हे दाखल करण्यात आले होते. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते.
सदाभाऊ खोत यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे, मुख्यमंत्री असताना चव्हाण यांनी सत्तेचा वापर जुलमी पध्दतीने केला, दडपशाही पध्दतीने काँग्रेस आणि सत्ताधाऱ्यांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु न्यायालयात कोणताही पुरावा काँग्रेसची मंडळी सादर करू शकली नाहीत, त्यामुळे मी पोलिसांना दोष देणार नाही असं खोत यांनी म्हटलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबात न्याय मिळेल असं वाटलं होतं, मात्र त्या अपेक्षा धुळीला मिळाल्या, सभ्य व्यक्ती राजकारणाच्या पटलावर आल्यावर अन्याय कसा करू शकतो त्याचं हे एक उदाहरण आहे, असा जोरदार टोला सदाभाऊ खोत यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर लगावला.
काय घडलं होतं 2012 साली?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 2012 साली ऊसदर वाढीबाबत आक्रमक आंदोलन केलं होतं, त्यावेळी शेतकरी संघनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत टायरही जाळले त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण आलं होतं. याप्रकरणी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर तब्बल 47 केसेस दाखल करण्यात आल्या होत्या, या सर्व केसेसमधून आता दोन्ही नेत्यांची सुटका करण्यात आली आहे.