MLA Prakash Surve : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जाऊन आता भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचं सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री असून आता एक-एक बंडखोर आमदार आपल्या मतदार संघात परतत आहे. मागठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे हे देखील शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दरम्यान मागील काही दिवस बाहेरगावी असलेले सुर्वेंदेखील आता त्यांच्या मतदार संघात परतत आहेत. उद्या अर्थात बुधवारी सायंकाळी 5 वाजता त्यांचे जोरदार स्वागत होणार असून आतापर्यंतचे हे सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन मागठाण्यात होणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे यावेळी या शक्तिप्रदर्शनात सहभागी होणार आहेत.


प्रकाश सुर्वे येताना त्यांचे समर्थक, स्थानिक नागरिक आणि चाहते उद्या सायंकाळी संजय गांधी नॅशनल पार्क ते हॉटेल गोकुळ अशी आनंद रॅली देखील काढणार आहेत. यावेळी सुर्वे समर्थक जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकही काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत जवळपास दहा हजार समर्थक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे.  


लवकरच होणार नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार


राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सगळ्यांचे लक्ष नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर लागले आहे. या नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम 12 किंवा 13 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवसानंतर विधीमंडळाचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधीच नवीन मंत्री आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात खाते वाटपावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. 


संबंधित बातम्या :