आमदार नितेश राणे यांची अटक आणि सुटका
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2017 12:07 PM (IST)
सिंधुदुर्ग : काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मालवण पोलिसांनी नितेश राणे यांना अटक केली होती. सहाय्यक मत्स्य आयुक्तांविरोधात केलेल्या मासेफेक आंदोलनप्रकरणी मालवण पोलिसांनी ही कारवाई केली. नितेश राणे यांच्यासह 24 जणांना मालवण पोलिसांनी अटक केली होती. अटक केलेल्या सर्व जणांना कुडाळ सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला. काय आहे नेमकं प्रकरण? मच्छिमारांच्या विविध प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी गेलेले काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले होते. आमदार नितेश राणे यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत जाब विचारण्यासाठी सहाय्यक मत्स्य आयुक्त जिल्हा कार्यालय मालवण इथं भेट दिली. यावेळी राणे त्यांच्यासोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली ओतली. यावेळी आयुक्तांसोबत चर्चा सुरु असताना, त्यांनी योग्य उत्तरं न दिल्याने चिडलेल्या नितेश राणे यांनी थेट त्यांच्या अंगावर मासे फेकले. तुम्ही तुमची कामं नीट करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, पैसे खाता, त्यामुळेच आम्हाला इथं यावं लागतं, असं म्हणत नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना झापलं.