रत्नागिरी : अरूणाचल प्रदेशात पूरग्रस्तांच्या मदत कार्यात असताना अपघातात शहीद झालेल्या राजेंद्र यशवंत गुजर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगडच्या पालवणी या त्यांच्या मूळगावी रात्री सव्वा आठच्या सुमारास त्यांना अखेरची सलामी देण्यात आली.
वायू दलाच्या जवानांनी बंदुकीतून हवेत तीन राऊंड फायर करून राजेंद्र गुजर यांना श्रद्धांजली वाहिली. राजेंद्र गुजर मंडणगडच्या पालवणी सारख्या दुर्गम भागातून वायूदलात भरती झाले होते. अरूणाचल प्रदेशमधील पापमपेर जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या बचावकार्यात सहभागी झालेल्या वायुदलाच्या एचएल ध्रुव हेलीकॉप्टरला झालेल्या अपघातात फ्लाईट इंजिनियर सार्जंट राजेंद्र गुजर कर्तव्य बजावत असताना शहीद झाले.
खराब हवामानामुळे 4 जुलै रोजी गुजर यांचं हेलीकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. यामध्ये एकूण चार जण होते, त्यापैकी सर्वांचा मृत्यू झाला. तीन जणांचे मृतदेह यापूर्वीच सापडले होते, पण राजेंद्र गुजर यांचा मृतदेह शनिवारी सापडला. त्यानंतर पार्थिव मूळगावी आणण्यात आलं.
राजेंद्र गुजर यांचं पार्थिव गावात आल्यानंतर संपूर्ण गाव शोकाकूल झालं होतं. लहान-मोठा प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता. राजेंद्र गुजर यांचं पार्थिव गावात आणल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हवाई दलाच्या जवानांनी पार्थिवाला सलामी दिली. गावच्या स्मशानभूमीत राजेंद्र गुजर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक आमदार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. राजेंद्र गुजर यांच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.