मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रतेच्या ( Mla Disqualification) सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी अलीकडे घेण्यात आली असून 13 ऑक्टोबरऐवजी 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमुळे विधासभा अध्यक्षांच्या (Rahul Narvekar) वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे.
शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेल द्वारे पाठवण्यात आला आहे. सुनावणीच्या वेळापत्राकत जो बदल करण्यात आला आहे तो सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे नाही तर जी 20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी सुप्रीम कोर्टाच्या तारखेआधी बरोबर विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेत आहे.
आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक कसं आहे?
- आमदार अपात्रतेच्या संदर्भात 12 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होणार आहे.
- 23 नोव्हेंबर नंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होणार आहे.
- सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्या या ठाकरे गटाच्या मागणीवर उद्या सुनावणी होणार
आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाणूनबुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली आहे. राहुल नार्वकरांच्या भूमिकेवर ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली जात आहे.
नियमानुसारच मी काम करणार : राहुल नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलताना म्हणाले की, "अनेक माध्यमातून, अनेक लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण यापूर्वीही सांगितलं आहे की, मी माझा निर्णय संविधानातील तरतूदींच्या आधारावर घेणार आहे. कोणीही कितीही मला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचे आरोप केले, तरीही मी त्यातून कोणत्याही प्रकारे प्रभावित होणार नाही. नियमानुसारच मी काम करणार."
नार्वेकरांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून अॅफिडेव्हिट
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या संबंधित वेळापत्रक सादर करावं असंही सांगितलं होतं. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक सादर केलं. पण त्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून या प्रकरणी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. तसेच राहुल नार्वेकरांच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक अॅफिडेव्हिट सादर केलं आहे.