मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar)  दिलेला निर्णय म्हणजे सत्याचा आणि लोकशाहीचा विजय आहे. अशी प्रतिक्रिया मुंबईत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)  दिली आहे.  हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका बसला, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते रात्री मुंबईत माध्यमांशी बोलत होते.


मुख्यमंत्री म्हणाले,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला आजचा निर्णय सगळ्यांचा आहे. सत्तेत आल्यापासून कायम  एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार असे सारखे बोलत होते. परंतु अजूनही मी सत्तेत कायम आहे. हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका मिळाला आहे.  हा लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विजय आहे.  आजचा जो निर्णय झालेला आहे तो प्रत्येक ठिकाणी एक माइल स्टोन ठरणार आहे. हा निर्णय जनतेच्या दृष्टीने खूप योग्य आहे.


हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका : मुख्यमंत्री


आमदार अपात्रचा प्रकरणावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधक कोणालाच मानत नाही. निवडणूक आयोग,  न्यायालयला देखील मानत नाहीत. ते सर्व संस्थांपेक्षा स्वतःला मोठे मानतात. नेहमी स्वतःला मोठे म्हणतात.  सुप्रीम कोर्टाला देखील अनेक सल्ले देण्याचे त्यांनी काम केलं म्हणून त्यांना आज मोठी चपराक मिळाली आहे. 2019 मध्ये त्यांनी जनतेसोबत बेइमानी केली त्यांना हा मोठा चपराक आहे, असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. 


प्रभू श्रीरामाने  22 जानेवारी अगोदरचं आशीर्वाद  दिला : मुख्यमंत्री


2019 साली बाळासाहेबांचे विचार विकले आणि सत्तेसाठी केले.  बाळासाहेबांनी काँग्रेसला कधी जवळ गेले नाही. सत्तेसाठी यांनी  काँग्रेसला जवळ केले आणि सरकार स्थापन केला. बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा चालवणाऱ्या  खऱ्या शिवसेनाला आज न्याय मिळाला आहे.  प्रभू श्रीरामाने  22 जानेवारीच्या अगोदर आशीर्वाद  दिला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या  आधी निर्णय आल्यने सर्व जनतेला न्याय मिळाला आहे.   आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये 45 हून अधिक जागा आम्ही जिंकून येणार आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


काय आहे निकाल?


एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय.