अमरावती : राज्यातील दिव्यांग, अनाथ, विधवा, शेतकरी, शेतमजूर तसेच माजी सैनिकांच्या विविध मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत उपोषण सुरु केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून बच्चू कडूंचं हे उपोषण सुरु असून, 16 तारखेपासून पाणीही पिणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील मैदानात बेमुदत अन्न त्याग आंदोलनला सुरुवात केली आहे. या अन्न त्यागाचा तिसरा दिवस असून राज्यभरात 1500 प्रहार कार्यकर्ते आंदोलन करत आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.



गेल्या 70 वर्षांपासून पालावरच्या घरात राहणारी लोकांची संख्येत वाढ झाली असून अनेक वर्षांपासून या लोकांना आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड यांसारखे महत्वाचे कागदपत्रे मिळाले नाहीत. त्यामुळे या लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

दिव्यांगांचे मानधन 600 रुपयांवरुन 1 हजार 500 रुपये करण्यात यावे, विधवा महिलांना मानधन देण्यात यावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित देण्यात यावी, या मागण्याही आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनात आहेत.

या आंदोलनात प्रतिकात्मक 100 पाल उभारण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असून, येत्या 16 तारखेपासून पाण्याचा सुद्धा त्याग करणार असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले.