करमाळा : करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या बिबट्याला मारायचे आजचे सर्व प्रयत्न फेल गेल्याने बिबट्याचे वास्तव्य असलेल्या चिखलठाण परिसरात मोठी दहशत पसरली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता याच ठिकाणी एक 9 वर्षांच्या ऊसतोड मजुरांच्या मुलीवर हल्ला केला होता. मुलीचा आवाज ऐकताच इतर ग्रामस्थ काठ्या घेऊन आल्यावर त्याने मुलीला सोडून शेजारील उसात पळ काढला होता. यानंतर मोठ्या संख्येने वन विभाग व पोलिसांचा सशस्त्र फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि सुरू झाले मिशन बिबट्या.
एक डिसेंबरपासून हा बिबट्या करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी, अंजनडोह आणि आज शेटफळ चिखलठाण परिसरात आपली दहशत ठेऊन आहे. आजपर्यंत तीन जणांचा बळी ह्या बिबट्याने घेतला आहे. आज चिखलठाण परिसरातील बारकूंड यांच्या शेतात तो दिसला होता. शार्प शूटर डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्यासह पाच गनमॅन ट्रॅप लावून बसले होते. बिबट्याला घेरण्यासाठी ऊस चारही बाजूने पेटवून दिला. पण त्याला अंदाज आल्याने बिबट्या सर्वांना गुंगारा देऊन निसटला आहे.
साडे चार वर्षे त्याचे वय असावे असा अंदाज डॉ. मंडलिक यांनी व्यक्त केलं आहे. शेटफळ परिसरातील लोकांनी सायंकाळी पाच ते सात आणि सकाळी दहा ते बारापर्यंत काळजी घ्यावी, कारण हा त्याचा हल्ला करण्याची वेळ आहे. हा बिबट्या जनावरांवर हल्ला करत नाही. तो फक्त माणसांवर हल्ला करतो. कदाचित माणसामुळे तो डिस्टर्ब झाला असावा, असा अंदाज मंडलिक यांनी व्यक्त केला. पण आज रात्री पेट्रोलिंग करून बिबट्याला मारू असा विश्वास त्यांना आहे.