मुंबई : उद्याच्या भारत बंद च्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्याचे आदेश एसटीच्या सर्व आगारांना प्रशासनाने दिले आहेत. हे निर्देश एसटीच्या राज्यातील सर्व विभागांना आगारांना देण्यात आले आहेत.


एसटी च्या स्थानिक प्रशासनानं तशी माहिती घेऊन त्या- त्या मार्गावरची वाहतूक सुरू ठेवायची की नाही याबाबत आढावा घेऊन निर्णय घ्यावयाचा आहे. यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही निर्देश आहेत. ज्या रस्तावर, मार्गावर आंदोलन होत आहे अथवा होणार आहे अशा मार्गावर वाहतूक करू नये, असे निर्देश आहेत.


केंद्र सरकारने आणलेल्या कृषी व पणन कायद्याला देशभरातून विरोध होत आहे.या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 8 डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात एपीएमसीच्या सर्व बाजारपेठा सहभागी होणार असून, त्या दिवशी संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे, तसेच व्यापारी व माथाडी कामगारांवर बेकारीचे संकट ओढावणार आहे. त्यामुळे या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी घोषीत केले आहे. नवी मुंबई एपीएमसी मधील पाचही मार्केट बंद करतानाच राज्यातील नाशिक , पुणे , नगर , कोल्हापूर मधील बाजार समित्याही उद्याच्या बंद मध्ये सहभागी होणार आहेत.