रायगड : रायगड जिल्ह्यात 24 तासात दोन ठिकाणी गाड्या जाळण्याचा प्रकार समोर आला. मंगळवारी मध्यरात्री नेरळ इथे तीन खाजगी बस जाळण्यात आल्या आहेत. किरकोळ वादातून ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु यात लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण आणि नेरळ येथे 24 तासात वाहने जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उरण शहरालगत असलेल्या भवरा परिसरात घराजवळ लावलेल्या मोटारसायकल जाळण्यात आल्या होत्या. डोंगरावर असलेल्या वस्तीमुळे घराजवळ असलेल्या रिकाम्या जागेत या मोटारसायकल गेल्या अनेक वर्षांपासून लावण्यात येत होत्या. त्यातच, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास याठिकाणी लावलेल्या गाड्यांनी अचानक पेट घेतल्याचे निदर्शनास आले आणि नऊ गाड्या आणि दोन सायकल जळून खाक झाल्या. सुमारे दोन तास सुरु असलेल्या या आगीवर स्थानिक ग्रामस्थांनी पाणी मारुन नियंत्रण मिळवले होते. यासंदर्भात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यातच, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास नेरळ येथील गावाजवळ लावण्यात आलेल्या खाजगी बसेस जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. नेरळ तालुक्यातील पिंपळोली येथील चंद्रकांत सोनावणे यांच्या मालकीच्या तीन स्कूल बस या गावाजवळील मैदानावर लावलेल्या होत्या. त्या देखील जाळल्याचे समोर आले आहे. यामध्ये, गावातील किरकोळ वादातून ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून यासंदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर, याप्रकरणी गावातील पाच व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी , कर्जतचे पोलीस उपअधीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी करुन तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, आगीच्या या घटनेमुळे चंद्रकांत सोनावणे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून किरकोळ वादाचा मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे.