हिंगोली : दर्जेदार शिक्षण मिळेल या भावनेनं आज-काल आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत टाकण्याचं प्रमाण पालकांमध्ये  दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यातील बोथी आदिवासी शासकीय आश्रमशाळा ही इंग्रजी शाळांनाही मागे टाकून एक आदर्श निर्माण करत आहे.


आदिवासी आश्रमशाळा म्हटलं की, आपल्या मनात एक वेगळं चित्रं येतं. पडकी शाळा, कमी विद्यार्थी संख्या. पण हे सगळं खोटं ठरवत एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे हिंगोलीत चक्क आश्रमशाळेची टोलेजंग इमारत आज उभी आहे.



आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी पदभार स्वीकारला आणि त्यांनी बोथी आश्रमशाळेचं रूपडंच पालटलं.  विशाल राठोड यांनी शासकीय आश्रमशाळा ISO 9001-2015 मानांकित  प्रयत्नाने मिळवून घेतले. मागील तीन वर्षापासून दहावीचा आश्रमशाळेच्या निकाल ९०% पेक्षा जास्त आहे.

या शाळेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या शाळेत शिकवण्याची एक वेगळी पद्धत आहे. विद्यार्थ्यांना साध्या आणि सोप्या  भाषेत अवघड विषय समजावं म्हणून इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांसाठी वेगवेगळ्या रूम तयार करण्यात आल्या असून डिजिटल बॅनरच्या माध्यमाने हे विषय शिकवले जातात. फावल्या वेळात विद्यार्थी या रूममध्ये येऊन हे विषय समजून घेतात. काही अडचण आली तर शिक्षक समजावून सांगतात. या नव्या पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये देखील शिकण्याविषयी आवड निर्माण होते.