नागपुरात कराटे क्लासवरुन परत येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एबीपी माझा वेब टीम | 21 Jul 2016 11:57 AM (IST)
नागपूर : कोपर्डी बलात्कार आणि हत्येचं प्रकरण ताजं असतानाच नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. नागपूरच्या इमामवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या टीबी रुग्णालयाच्या मागील बाजूस ही घटना घडली. 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी काल (बुधवारी) संध्याकाळी वकीलपेठ भागातील कराटे क्लासला गेली होती. तिथून पायी घरी परतत असताना तिच्यावर अत्याचार झाले. या घटनेत मुलीच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. या प्रकरणी इमामपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आरोपी कोण हे अजून निष्पन्न झालेलं नाही. परंतु पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. पीडित मुलगी ही कराटेमध्ये यलो बेल्टधारक आहे. दिल्लीला 31 जुलै रोजी ब्लॅक बेल्टसाठी होणाऱ्या स्पर्धेत ती सहभागी होणार होती.