नवी मुंबई : तळोजा येथील एक अल्पवयीन मुलगी काल रात्रीपासून बेपत्ता आहे. घरातून बेपत्ता होण्यापूर्वी तिने आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. विशेष म्हणजे या सुसाईड नोटमध्ये तिने पुण्याचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) निशिकांत मोरे यांच्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. 26 डिसेंबर रोजी संबंधित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी निशिंकात मोरे यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुणे येथे मोटर ट्रान्सपोर्ट विभागात DIG असलेल्या निशिंकात मोरे यांच्यावर एका अल्पवयीन मुलीने गंभीर आरोप केले आहेत. जुन महिन्यात संबंधित मुलीचा वाढदिवस होता. निशिंकात मोरे आणि मुलीचे कुटुंबीय एकमेकांच्या परिचयाचे असल्याने मोरे त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करायला गेले होते. केक कापल्यानंतर मोरे यांनी या मुलीचा विनयभंग केला असल्याचा आरोप मुलीच्या कुटुबियांनी केला होता.


विनयभंग केल्याचा मोबाईल व्हिडीओ तळोजा पोलीस ठाण्यात देत मलीच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास सहा महिने टाळाटाळ केली. अखेर 26 डिसेंबर रोजी निशिंकात मोरे यांच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.


विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जामीन मिळविण्यासाठी निशिकांत मोरे सध्या प्रयत्न करत आहेत. आज पनवेल कोर्टात त्यासंबंधी सुनावणी होणार होती, परंतु ही सुनावणी आता 9 जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान याआधीच काल रात्री अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली आहे.


मी निराश झालो आहे, या खटल्यामुळे परिवाराची बदनामी झाली आहे, म्हणून मी आत्महत्या करत आहे, असे या मुलीने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. माझ्या आत्महत्येला डीआयजी निशिंकात मोरे जबाबदार आहेत, असेही तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. निशिंकात मोरे हे खारघर येथील रहिवासी असून ते सध्या पुण्यात मोटर ट्रान्सपोर्ट विभागात डीआयजी म्हणून कार्यरत आहेत.


सुनावणीच्या आदल्या दिवशीच पीडित मुलगी बेपत्ता झाल्याने, निशिकांत मोरे यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.