कल्याण: व्हॉट्सअॅप वापरण्यावरुन आई रागावल्याने एक अल्पवयीन मुलगी घर सोडून गेल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या घटनेनं पालकवर्गात मात्र खळबळ उडाली आहे.


अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एक अल्पवयीन मुलगी फेब्रुवारी महिन्यात मित्रांसोबत पिकनिकला जाऊन आल्यानंतर व्हॉट्सअॅपवर आलेले फोटो पाहात बसली होती. याच कारणावरुन तिची आई तिला रागावली. यामुळे निराश झालेली ही मुलगी घरात कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेली.


दुसऱ्या दिवशी वाशी इथे फिरत असताना एका जागरुक महिलेला ही मुलगी आढळली आणि तिने या मुलीला पोलीस ठाण्यात नेलं. तिथे पोलिसांनी अंबरनाथ पोलिसांशी संपर्क साधून तिच्या आईवडिलांना बोलावून घेतलं. या प्रकरणात मुलीचं आणि तिच्या पालकांचं समुपदेशनही करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं.


फेब्रुवारी महिन्यात घडलेला हा प्रकार आज अंबरनाथ शहरात उघडकीस आला. त्यामुळे पालकवर्गात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पालकांना सामंजस्याने वागण्याचा सल्ला दिला असून मुलांनीही एखाद्या गोष्टीचा अतिरेक न करण्याचं आवाहन केलं आहे.