नांदेड : नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात पाणी आणायला गेलेल्या सहावीतील विद्यार्थिनीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना काल संध्याकाळी कांजाळ तांडा येथे उघडकीस आली.

कांजाळा तांडा येथील रहिवाशी सारिका राठोड (वय13) ही पाण्यासाठी विहिरीवर गेली होती. पाणी काढताना सारिकाचा विहिरीत तोल गेला आणि आणि ती विहिरीत पडली. त्यात तिचा मृत्यू झाला. लोहा तालुक्यात वारंवार पाण्याच्या टँकरची मागणी करुन देखील प्रशासनाने टँकर दिला नाही. त्यामुळे या मुलीचा पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागली. त्यातच विहिरीत पाणी काढताना सारिकाचा मृत्यू झाला. या सर्व घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे.

VIDEO | नांदेड जिल्ह्यात पाणी आणण्यासाठी गेलेल्या चिमुकलीचा विहिरीत पडून मृत्यू | एबीपी माझा



सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात सत्ताधारी, विरोधक लोकसभेच्या प्रचारात गुंग आहेत. पण तिकडे दुष्काळानं त्रस्त असलेल्या मराठवाड्याकडे कुणाचंही लक्ष नाही. सध्या मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी खालावली आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कमालीची पाणीकपात करण्यात आली आहे. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरी सात दिवसाआड पाणीपुरवठा होतोय. त्यामुळे निवडणुकीदरम्यान घोषणांचा पाऊस पाडण्याऐवजी नागरिकांना पाण्याच्या दुष्काळापासून दूर करण्याविषयी राजकीय पक्षांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होते आहे.