मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहेत. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात थेट हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान हे प्रकरण उघड झाल्यापासून मंत्री संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे गेलेत? याबाबत कुठलीही माहिती नाही. ते पुण्यातील आढावा बैठकीलाही गैरहजर होते. त्यानंतर पुणे, मुंबई येथे असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
दरम्यान आज नॉट रिचेबल असलेल्या संजय राठोड यांची कार मुंबई परिसरात पाहायला मिळाली. आधी चर्चगेट परिसरात आणि नंतर मंत्रालय परिसरात राठोड यांचा ताफा उभा होता. दुसरीकडे वन मंत्री संजय राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. काल वर्षा निवास्थानी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून या प्रकरणा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. दरम्यान पुढील 24 तासात राठोड प्रसिद्धीपत्रक काढून आपली बाजू मांडतील असी देखील माहिती मिळाली आहे.
Sanjay Rathod : माध्यमांशी बोलू नका, मंत्री संजय राठोड यांना शिवसेनेकडून तंबी!
शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड यांना तंबी देण्यात आली आहे. माध्यमांशी बोलू नका, असे आदेश राठोडांना पक्षाकडून देण्यात आले आहेत. घटना गंभीर असल्यानं राठोडांचं वक्तव्य आणखी अडचणी वाढवू शकतात, त्यामुळे पक्षाने सावध पवित्रा घेतला आहे. भाजप आक्रमक असताना राठोड यांच्या कुठल्याही वक्तव्यांनं पक्षाची अडचण होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - भाजप
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहेत. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात थेट हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तर थेट संजय राठोड यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी थेट पोलीसांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. पोलीस कोणाची वाट बघत होते, हातावर हात धरून का बसले होते? सुमोटो अंतर्गत गुन्हा का नाही दाखल केला. बारा ऑडिओ क्लीप बाहेर आल्या त्या प्रत्येक क्लीपचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची थेट मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. शक्ती कायदा येतोय त्याचे स्वागत आहे. मात्र कायदे बनवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नसेल तर महाराष्ट्रातील महिला आणि मुली सुरक्षित होणार नाहीत, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
कोण आहेत संजय राठोड
संजय दुलीचंद राठोड हे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत.
ते दिग्रस विधानसभा मतदार संघातून 2004 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते.
2009 मध्ये पुन्हा निवडून आले.
2014 मध्ये त्यांची महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यांना महसूल विभाग देण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी देखील देण्यात आली .
2004 ते 2019 पर्यंत ते सलग निवडून आले आहेत.
आता ते वनमंत्री आहेत.
आमदार होण्यापूर्वी ते शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष होते.
30 डिसेंबर 2019 रोजी त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते.
राठोड हे बंजारा समाजातील आहेत.