सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यावर्षी ऊस दराच्या मागणीवरून केलेल्या आंदोलनावर आणि नंतर घेतलेल्या माघारीच्या भूमिकेवर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यावर्षीच ऊस दराचे आंदोलन ही निव्वळ स्टंटबाजी असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.


लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही आंदोलने सुरू आहेत. या ऊस आंदोलनात दम नव्हता. रयत क्रांती संघटनेच्या ऊस परिषदेत मुख्यमंत्री यांनी एफआरपीचा पैस वसूल करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देऊ अशी घोषणा केली होती. यासाठी वेळ पडली तर सरकार कारखानदाराच्या मागे खंबीरपणे उभे राहिल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होते .राज्याच्या मुख्यमंत्र्यानी हे आश्वासन देऊन देखील 2-3 दिवस हे आंदोलनाचे नाटक कुणासाठी आणि कशासाठी केलं? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.


ऊस दराच्या नाटकी आंदोलनातून ढोंगी शेतकरी नेत्यांचा चेहरा उघडा पडलेला आहे, असे म्हणत खोत यांनी राजु शेट्टीवर टीकास्त्र सोडलं आहे.


कोल्हापूर, सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन स्थगित


कोल्हापूर आणि सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आजचं चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. ऊस दराबाबत रविवारी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकड़ून देण्यात आला होता.


मात्र, कारखानदार आणि स्वाभिमानीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत तोडगा काढण्यात आला आहे. कारखानदारांनी सुरुवातीला एफआरपी देण्याचं मान्य करुन साखरेचे दर वाढल्यानंतर उर्वरित दोनशे रुपयांची उचल देण्याबाबत होकार दर्शवला आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीत होणार स्वाभिमानीचं आंदोलन स्थगित करण्यात आलं.