पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी पुण्यातल्या काँग्रेस नेत्यांचे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी साटंलोटं असल्याचा आरोप केला आहे. त्यासंबधीचे पत्र बालगुडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठवले आहे. बालगुडे यांनी कोणत्याही काँग्रेस नेत्याचे नाव जरी घेतले नसले तरी, त्यांच्या आरोपांचा रोख हा कॉंग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांच्याकडे आहे.
बीडमधील औषध पुरवठ्याच्या घोटाळ्यासंदर्भातीली याचिकेवर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गिरीश बापटांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर पुण्यात गिरीश बापट यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आंदोलन केले. परंतु काँग्रेसने बापटांविरोधात आंदोलन केले नाही. त्यामुळे बालगुडे यांनी अशोक चव्हाणांना पाठवलेल्या पत्रात पुणे शहर कॉंग्रेसला बापटांविरोधात आंदोलन करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
बालगुडे यांनी पत्रात म्हटले आहे की, पुण्यातील काही कॉंग्रेस नेत्यांचे गिरीश बापट यांच्यासोबत असलेलं साटंलोटं पुण्यातील उघड गुपित आहे. गिरीश बापट आणि रमेश बागवे यांचे विधानसभा मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत पुण्यातून गिरीश बापट यांच्या विधानसभा मतदारसंघातून सुरेश कलमाडी यांना चांगल्याप्रकारे मतदान होत होते. त्यामुळे गिरीश बापटांचे पुण्यातील काँग्रेस नेत्यांशी साटंलोटं असल्याचा आरोप अनेतदा बापटांवर झाला आहे.
काँग्रेस आणि भाजप नेत्यांचं साटंलोटं : काँग्रेस नेत्याचा आरोप
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
23 Jan 2019 11:44 AM (IST)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी पुण्यातल्या काँग्रेस नेत्यांचे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी साटंलोटं असल्याचा आरोप केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -