सांगली  : भाजपमधील वादग्रस्त वक्तव्यांची परंपरा कायम आहे. कार्यतत्पर मंत्री म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगलीत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत यामध्ये भर टाकली आहे.


सांगली जिल्ह्यातील नागजमध्ये एका कार्यक्रमात 'एकवेळ हिजड्याशी लग्न केली तर मुलं होतील, पण तुमच्या भागातील टेंभू योजना कधी पूर्ण होईल, असे मला वाटत नव्हते, असे विधान गडकरी यांनी केले आहे.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वरील सांगली-सोलापूर मार्गाचे चौपदरीकरण व राष्ट्रीय महामार्गच्या दुरुस्ती कामांचे कोनशिला अनावरण आणि सिंचन योजनांच्या मुख्य कामांच्या पूर्णत्वाचा वचनपूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना गडकरी यांनी हे विधान केलं.


यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश बापट, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख,  मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय पाटील आदी उपस्थित होते.


टेंभू योजना ही आशिया खंडातील सर्वात मोठी योजना म्हणून ओळखली जाते. टेंभू सिंचन योजना मागील अनेक वर्षापासून रखडली होती. मात्र, नुकतेच त्याचे काम पूर्ण झाले. यावेळी केंद्रातील मोदी सरकारसह मुख्यमंत्री व राज्यातील विविध मंत्र्यांनी, नेत्यांनी टेंभू योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करून टेंभू योजनेचे काम पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. त्यावेळी बोलता- बोलता गडकरींनी यापूर्वी एकदा खाजगीत केलेले  वादग्रस्त वक्तव्य पुन्हा सार्वजनिक ठिकाणी बोलून दाखवले.


पाहा व्हिडीओ