बीड : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या काही नेत्यांच्या वक्तव्यामुळे सरकारमध्ये धुसफूस सुरु आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीबद्दल एक वक्तव्य केलं. आणीबाणीच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केल्याचं वक्तव्य आव्हाड यांनी केलं. बीडमध्ये आयोजित संविधान महासभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात देशाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देशात कुणीही बोलायला तयार नव्हते. मात्र अहमदाबादच्या आणि पटनाच्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला तेव्हा जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरु झालं आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. हा इतिहास परत एकदा महाराष्ट्रात आणि देशात घडेल, म्हणून याचे श्रेय जेएनयू आणि तिथल्या विद्यार्थ्यांला जातं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. विद्यार्थी न घाबरता बाहेर पडत आहेत. कायदा समजून सांगत आवाज देत आहेत. आज विद्यार्थी संख्येने कमी दिसत आहेत. मात्र ही संख्या हळूहळू वाढेल आणि विद्यार्थी देशाला दुसरी आझादी मिळवून देतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
काँग्रेसची नाराजी
जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. देशाची एकता आणि अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या इंदिरा गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता आणि कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी वेळीच खुलासा केला ते बरं झालं. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की कुणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं ट्वीट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण
माझ्या भाषणाच्या अर्थाचा अनर्थ काढला जात आहे. काँग्रेसची चळवळ ही माझ्या रक्तात आहे. इंदिरा गांधींनी अनेक राष्ट्रहिताचे निर्णय घेतले. मात्र आणीबाणीच्या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सर्वात आधी आंदोलन सुरु केलं, नंतर जनता पेटून उठली आणि त्यांची सत्ता उलथून लावली. मी इंदिरा गांधी यांचा समर्थक आहे. या देशात इंदिरा गांधी यांच्याइतकं प्रभावशाली कर्तृत्व कोणाचं नव्हतं. आज अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्यामुळे इंदिरा गांधी यांची सत्ता जनता नाकारु शकते, तर मग अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणीच नाहीत, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.