मुंबई : वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी करण्यात येत आहे. ऑनलाईन अॅपवर महिलांचे फोटो अपलोड करुन त्यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यानंतर राजकीय नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनांचा निषेध केला आहे. हे अतिशय निंदनीय असून, 'भारतीय संस्कार आणि संस्कृतीमध्ये यांना कुठलेही स्थान नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. हे धार्मिक राक्षस भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाहीत. हा देश Genocide कडे चालला आहे असे वाटायला लागले' असल्याचे आव्हाड म्हणालेत.
दरम्यान, मुस्लीम महिलांना टार्गेट करणाऱ्या सुली डील्स, बुली बाई या अॅपच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानंतर बुली बाई या अॅपविरोधात दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पत्रकार इस्मत अरा हिने कलम 153A (धर्माच्या आधारावर वैर वाढवणे), 153B(राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रतिकूल आरोप), 354A (लैंगिक छळ) या कलमाअंतर्गत दिल्ली पोलिसांमध्ये अज्ञांताविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 509 (शब्द, हावभाव किंवा स्त्रीच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतू) या कलमान्वये तक्रार दाखल केली आहे. याचबरोबर मुंबई पोलिसांनी देखील संबंधित ट्विटर हँडल आणि 'बुली बाई' च्या विरोधात कलम 153A, कलम 153B, कलम 295A (धार्मिक श्रद्धांचा अपमान), 354D,कलम 509 तसेच कलम 67 (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) या कलमातंर्गत गुन्हा नोंद केला आहे.
मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली होती. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या प्रकरणी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली आहे, मात्र ते दखल घेत नसल्याचा आरोपही प्रियंका चतुर्वेदी यांनी केला होता. तसेच या प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ऑनलाईन पोर्टलवर महिलांची बदनामी करण्यात येत असून, हा मोठा गुन्हा आहे. याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. याआधीही असे प्रकार घडले आहेत. यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मुलींना बदनाम करण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी मी पाठपुरावा करणार असल्याचे मलिक म्हणाले.
या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत अशा घटनांचा निषेध केला आहे. तसेच महिला आयोग कार्यालयाने दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत. सुल्ली डील नावाच्या ॲप वरून मुस्लिम महिलांचे फोटो, प्रोफाइल व त्यासमोर किंमत लिहून प्रसारित केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: