मुंबई : पावसाळा सुरु झाल्या क्षणापासून किंबहुन त्याआधीपासूनच आपलं शिवार, शेत खुलवण्यासाठी म्हणून बळीराजा शेतीच्या कामांना लागला. काही दिवसांपूर्वीच राज्यात येऊ घातलेल्या या वरुणराजामुळं शेतकरी वर्ग कमालीचा सुखावला. याच सर्व वातावरणात आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राज्याच्या मंत्रीमंडळातील एक चेहरा शेतीच्या कमात रमल्याचं दिसत आहे.
हा चेहरा म्हणजे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते शेतात पेरणी करताना दिसत आहेत. मातीत राबत, सोबत काही मंडळींचं मार्गदर्शन घेत आपण पेरणी व्यवस्थित करत तर आहोत ना, याबाबतचे प्रश्न विचारत एकनाथ शिंदे इथं पेरणी करताना दिसत आहेत. त्यांचा हा अंदाज सध्या अनेकांचीच मनं जिंकत आहे.
जनमानसातील नेता अशी एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. शिवसेना नेते अशी ओळख असण्यासोबतच राज्याच्या मंत्रीमंडळातही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. असं असतानाही आपल्या समाजातील घटकांसोबत वावरण्याचा त्यांचा हा अंदाज कायमच अनेकांच्या मनाचा ठाव घेतो.
काही दिवसांपूर्वीच, पालघर जिल्ह्याचे आमदार श्रीनिवास वनगा यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या शेतात सध्या भाताच्या पेरणीची कामं सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर श्रीनिवास वनगा त्यांच्या आईसोबत शेतातील चिखलात उतरत भाताची पेरणी करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला. यापूर्वीही श्रीनिवास वनगा शेतात काम करताना त्यांचा व्हिडीओ समोर आला होता.