मुंबई: राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज चाकरमान्याप्रमाणं चक्क लोकलनं मुंबई गाठली. कोल्हापूर-मुंबई रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मंत्री महोदयांनाही आज रेल्वेच्या अनियमित सेवेचा फटका बसला. त्यामुळेच त्यांना कर्जत ते मुंबईपर्यंतचा प्रवास लोकल ट्रेननं करावा लागला.

मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी सोमवारी रात्री कोल्हापूरहून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र साताऱ्यात आल्यावर इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं  रेल्वे तब्बल तीन तास एकाच ठिकाणी खोळंबून राहिली.



महालक्ष्मी एक्सप्रेस कर्जतला आल्यानंतर लोकलच्या व्यस्त वेळापत्रकामुळे गाडी साईड ट्रॅकवा काढण्यात आली. त्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेसला मुंबईला पोहचण्यास आणखी वेळ लागणार होता. दरम्यान, मंत्रालयात 11 वाजता मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी मग वेळ न दवडता कर्जतहून पत्नीसह आपल्या सामानाचा लवाजमा घेत थेट लोकल ट्रेन पकडली. त्यानंतर त्यांनी कर्जत ते सीएसएमटी असा लोकलनं प्रवास केला  अन् अगदी वेळेत मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली.