कराड: रावसाहेब जाधव या संशयिताचा पोलीस ठाण्यातच मृत्यूप्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्यासह दहा पोलीस शिपायांना खुनाच्या गुन्ह्यात सीआयडीनं अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर यातील मुख्य अरोपी वरिष्ठ पोलिस निरिक्षक विकास धस याला फरार घोषित केलं.


काय आहे नेमकं प्रकरण:

पुणे– बेंगलोर महामार्गावर साताऱ्यातील कराडजवळ खाजगी ट्रॅव्हलमध्ये बसलेल्या आंगडीयाचे अडीच किलो सोनं आणि अडीच लाख रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे 78 लाखांचा ऐवज चोरीला गेला होता.  यात कराड गुन्हे प्रकटीकरण विभागाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रावसाहेब जाधवसह दोघां संशयिताना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या मारहाणीत रावसाहेब जाधव याचा पोलिस ठाण्यातच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर करमाळ्याच्या नातेवाईकांनी आणि राजकिय नेत्यांनी पोलिस ठाण्याबाहेर राडा घातला होता. अधिक्षकांनी या विकास धस आणि कांकडकी या दोन अधिकाऱ्यांसह अकरा जणांना निलंबित करुन त्यांच्यावर कराड पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल केला होता.

यातील कांकडकी या पोलिस अधिकाऱ्यासह दहा पोलिस कर्मचाऱ्यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, अटकपूर्व जामिन होणार नाही याचा अंदाज घेत वरिष्ठ पोलिस निरिक्षक विकास धस वगळता सर्वांनी अर्ज काढून घेतले होते. विकास धस याचा अटकपूर्व अर्ज हायकोर्टाने फेटाळल्यानंतर विकास धस हा फरार झाला.

उर्वरित संशयित अरोपी हे आज कराड न्यायालयात हजर झाले. दरम्यान, त्यांना अटक करण्यात आली असून 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.