अमरावती : अमरावतीच्या अचलपूर विभागातील निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना आधार मिळावा म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने 'ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे' ही योजना सुरू केली आहे. शेतकरी कुटुंबात पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याची वेळ महिलांवर येते. पण पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून? अशा विवंचनेत या महिला भगिनी असतात. नेमकी ही बाब राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या लक्षात येताच त्यांनी 'ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे' ही योजना जाहीर केली.
बच्चू कडू यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराआई कडू यांच्या वाढदिवशी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेची नोंदणी अचलपूर विभागातील गावांमध्ये सुरू करण्यात आली आणि अजूनही सुरू आहे. आतापर्यंत जवळजवळ 200 एकर पेक्षा जास्त शेतीची कामे या योजनेतून करून देण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व गावांत ही कामे पूर्ण करून त्या महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना शेतीसाठी मोठा आधार या योजनेतून मिळत आहे.
बच्चु कडू यांच्या संकल्पनेची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व चांदुरबाजार तालुक्यातील 600 किमी लांबीच्या पाणंद रस्त्याचं उद्घाटन नुकतच संपन्न झालं. दोन्ही तालुक्यातील सुमारे 117 गावांतील 600 किमी लांबीच्या पाणंद रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. रस्ते निर्मितीसाठी स्वतः बच्चू कडू यांनी त्यांच्या आमदार निधीतून 1 कोटी 44 लाख 43 हजार 560 रुपयांचा निधी दिला. याव्यतिरीक्त पालंकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून 5 कोटी 60 लाख, मनरेगातून 4 कोटी 2 लाख रूपयाचा निधी पाणंद रस्ते निर्मितीसाठी मिळाला आहे.
बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून अचलपूर तालुक्यात निर्माण होणाऱ्या पाणंद रस्त्यांसाठी तसेच हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी होण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. जिल्ह्यात पाणंद रस्त्यांची कामे वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण व्हावीत तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाजारपेठपर्यंत पोहोचवणे सोईचे होण्यासाठी ग्रामस्तर, मंडळस्तर आणि तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी या योजनेची प्रसंशा केली आहे. पाणंद रस्ते ही एक लोक चळवळ म्हणून उभारण्यात यावी, अशी मागणीच यानिमित्ताने सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.