बुलढाणा : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्यात आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. राज्यात बेड्स, ऑक्सिजन आणि लसींचा तुटवडा निर्माण होत आहेत. अशातच कोरोना संकटात जनतेचे हाल होत आहेत आणि राजकीय नेते राजकारणात दंग आहेत. या राजकीय चिखलफेकीत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल मर्यादा ओलांडत भाजप नेत्यांवर टीका केली आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


संजय गायकवाड बोलताना म्हणाले की, "महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचं नीच राजकारण सर्व महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चंपा नावाचे ते चंद्रकांत पाटील. आज हा कोरोना कोणा पक्षाचा कार्यकर्ता पाहून येत नाही. कोरोना फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसला होत नाही. तर या कोरोनाने प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला विळखा घातला आहे. आज बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला देण्यासाठी लसी आहेत, पण महाराष्ट्राला नाही. बांगलादेश, पाकिस्तान महाराष्ट्रपेक्षा जास्त महत्वाचे आहेत का? ही राजकारण करण्याची वेळ आहे."


पाहा व्हिडीओ : कोरोनाचे जंतू सापडले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते : शिवसेना आमदार संजय गायकवाड



"भाजप नेत्यांना लाज वाटली पाहिजे की, तुम्ही राजकारण कुठे करताय? मोदी सरकार, फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. फडणवीस मुख्यमंत्री असते तर नरेंद्र मोदींनी काय केलं असतं? चंद्रकांत पाटील मंत्री असते तर काय केलं असतं? राज्यातील मंत्री जीव तोडून नियोजन करत असताना मदत करायची सोडून राजकारण करत आहेत, खिल्ली उडवतात. हे सरकार अपयशी होईल हे पाहतात. पण यामध्ये लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याच्या घरातील माणूस जातं, त्याला समजतं कोरोना काय आहे." , असं संजय गायकवाड म्हणाले. 


"मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते. इतका तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झाला आहे. म्हणून राजकारण न करता राज्याला मदत केली पाहिजे. आधी महाराष्ट्र जगला पाहिजे, माणूस जगला पाहिजे, नंतर राजकारण आहे. माणसंच मेली तर कोण मतदान करणार आहे तुम्हाला?", असं म्हणत संजय गायकवाड यांनी मर्यादा ओलांडत भाजप नेत्यांवर टीका केली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :