नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनने राज्यभर पुकारलेल्या दूध आंदोलनाचा परिणाम आज फारसा जाणवत नसला तरी उद्या ग्राहकांसाठी अडचण निर्माण होऊ शकते. परंतु दूध पुरवठा सुरळीत राहिल. तुटवडा निर्माण होऊ देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्री बोलत होते.

दूध दरासाठी आंदोलन
दुधाला प्रतिलीटर पाच रुपयांची दरवाढ द्यावी, या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपुरात विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालत दूध आंदोलन सुरु केलं. अनेक शहरांना होणारा दूधपुरवठा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला. पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर दुधाचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. पुण्यात रस्त्यावर दूध फेकण्यात आलं.

गोकुळसह काही दूध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. सोलापुरातील माढा आणि सांगोला तालुक्यात दूध रस्त्यावर ओतून स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. तर अमरावतीत राजू शेट्टींच्या काही कार्यकर्त्यांनी दुधाचा एक टँकर फोडण्याचा प्रयत्न केला.

राजू शेट्टींना चर्चा करायची नाही
परंतु दूध पुरवठा सुरळीत राहिल. तुटवडा निर्माण होऊ देणार नाही. दुधाला 21 जुलैपासून तीन रुपयांची वाढ देण्याचा निर्णय झाला आहे. आम्ही राजू शेट्टींबरोबर चर्चा करायला तयार आहोत, पण त्यांनाच चर्चा करायची नाही, असा मुख्यमंत्री म्हणाले.

तर नवा गैरव्यवहार होईल
40 टक्के दूध हे दूध संघ घेतात, 60 टक्के खाजगी दूध संकलन होते. खाजगी दूध संकलनाचे रेकॉर्डच सरकारकडे नाही. यातून नवा गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे दुधाला थेट अनुदान देता येणार नाही. गुजरातमध्ये सहकारी संघ जास्त आहेत, त्यामुळे तिथे थेट अनुदान देणे शक्य आहे. दूध निर्यात झालं तर अधिकचं दूध तयार होईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.