अकोला | अकोल्याच्या शासकीय डेअरीतल्या भेसळीचा प्रकार समोर आला आहे. राज्यात दुधात भेसळी कशी होते याचं हे बोलकं उदाहरण आहे. अकोल्यातील शासकीय दूध योजनेच्या टँकरमध्ये कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारीच कशी भेसळ करतात याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

अकोला-मूर्तिजापूर मार्गावर शासकीय दूध योजनेचं कार्यालय आहे. अकोल्याच्या शासकीय डेअरीतून राज्यातील भंडारा, सांगली, सोलापूर, पुण्यासह मुंबईच्या 'महानंद'ला दूध पुरवठा केला जातो. दर दोन दिवसांनी अकोल्यातून दहा हजार लिटर क्षमतेचा दुधाचा एक टँकर या ठिकाणांवर पाठवला जातो.

मात्र या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी या दुधात दुध पावडर आणि पाणी मिसळून ही भेसळ करतात. या व्हिडीओमध्ये खुद्द शासकीय डेअरीचा व्यवस्थापकही दिसतो आहे. त्यामुळे भेसळीच्या या साखळीत बडे अधिकारीही सहभागी असल्याचं स्पष्ट होतं आहे.

दरम्यान व्हिडीओत या कार्यालयातील सहा कर्मचारी भेसळ करीत असल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. अकोल्यातील हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन आता काय कारवाई करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.