Mhada Exam : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरतीअंतर्गत  अतांत्रिक पदासाठी सोमवार, दि. ०७ फेब्रुवारी, २०२२ रोजी आयोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. 'म्हाडा'चे सचिव राजकुमार सागर यांनी ही दिली. 


म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सुरू आहे. याआधी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा पार पडणार आहे. म्हाडा भरती परीक्षा सोमवार ७ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजेपासून ते ११.०० वाजेपर्यंत, दुपारी १२.३० वाजेपासून ते २.३० वाजेपर्यंत तर दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे. परीक्षा वेळापत्रकात कोणताही बदल झाला नसल्याची माहिती म्हाडाने दिली असून परीक्षार्थींनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


म्हाडातील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा घेण्यात येत आहे. म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीवर सोपवण्यात आली आहे.  टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे. याआधी जीए सॉफ्टवेअर कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी होती. पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं गोपनीयतेचा भंग करून पेपर फोडण्याचा कट रचल्याचं उघडकीस आलं होतं. 


आज राज्यात दुखवट्यानिमित्त सुट्टी


भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. त्याशिवाय राज्य सरकारने दुखवटा म्हणून सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. या सार्वजनिक सुट्टीमुळे प्रशासकीय कामकाज, शाळा-महाविद्यालये, बँका आणि इतर आस्थापने बंद असणार आहेत.