मुंबई : संपूर्ण मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मेट्रोची कामं सुरु आहेत. मेट्रो प्रकल्पांसाठी काही प्रमाणात स्थानिकांचं (मूळ मुंबईकरांचं) स्थलांतर केले जात आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले, तसेच लोकांना शांत न बसण्याचे आवाहनही केले.
यावेळी राज ठाकरे मुंबईकरांना उद्देशून म्हणाले की, मेट्रो मुंबईतल्या मराठी माणसाचा घात करणार आहे. माझा विकासाला विरोध नाही, कधीही विरोध नव्हता, परंतु मुंबईतली मेट्रो मराठी माणसाच्या मुळावर उठली आहे. प्रभादेवी येथील मनसेच्या प्रचारसभेत राज बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, शहरातली गर्दी बाहेर जावी अथवा कमी व्हावी, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ते सोडून इथलं सरकार मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांसाठी मेट्रोसारखे विविध प्रकल्प सुरु करत आहे. त्यासाठी सत्ताधारी भूमिपूत्रांना चिरडण्याचं काम करत आहेत. त्यांना मुंबईबाहेर काढलं जात आहे.
राज ठाकरे म्हणाले की, इथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. त्याउलट हे सरकार इथल्या भूमिपुत्रांना, मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईबाहेर काढत आहेत. इथल्या जमिनी बळकावल्या जात आहेत. सत्ताधारी या जमिनी बिल्डरांच्या घशात घालत आहेत. असे असूनही तुम्ही सर्वजण शांत का?
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे मुंबईतल्या मराठी पट्ट्यातल्या तरुणांना मुंबईबाहेर जावं लागत आहे. मराठी पट्ट्यातले मराठी भाषिक मुंबईबाहेर फेकले गेल्याने इथली भाषा बदलू लागली आहे. त्याचं उदाहरण देताना राज म्हणाले की, शिवाजी पार्कच्या आसपास फेरी मारताना मराठी भाषेऐवजी इतर भाषा कानावर पडतात, तेव्हा वाईट वाटतं.
राज ठाकरे यांनी यावेळी शिवसेनेवरही टीका केली. राज म्हणाले की, मेट्रोसाठी रातोरात आरे कॉलनीमधील तब्बल 2700 झाडं तोडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात की, आम्ही आरेला जंगल घोषित करु. पण तिथे झाडंच नसतील तर जंगल कसं घोषित करणार. पक्षप्रमुख तिथे गवत लावण्यापासून सुरुवात करणार का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
मेट्रो मुंबईतल्या मराठी माणसाचा घात करणार; राज ठाकरेंचा इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Oct 2019 09:35 PM (IST)
संपूर्ण मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मेट्रोची कामं सुरु आहेत. मेट्रो प्रकल्पांसाठी काही प्रमाणात स्थानिकांचं (मूळ मुंबईकरांचं) स्थलांतर केले जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -