बारामती : राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या सभासद भागाच्या दर्शनी मूल्यांची रक्कम 10 हजारावरून 15 हजार इतकी सरकारने केली आहे. राज्यात सध्या  सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांना प्रत्येक शेअर मागे 5 हजारांचा फटका बसणार आहे. यातून शेतकऱ्यांना मात्र तोटा सहन करावा लागणार आहे. राज्यात सध्या 95 सहकारी साखर कारखाने आहे,  तर त्याची सभासद संख्या 22 लाख इतकी आहे. सरकारच्या या निर्णयाला शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे.


राज्य सरकारने राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्याच्या सभासद भागाच्या दर्शनी मूल्यांची रक्कम 15 हजार इतकी केली आहे. जी आधी 10 हजार रुपये इतकी होती.  म्हणजेच सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाला आपलं सभासदत्व टिकवण्यासाठी आता 15 हजार रुपये भरावे लागणार आहेत.  त्यामुळे यातून जमा होणारी रक्कम 3300 कोटींच्या घरात आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे खाजगीकरण वाढीला लागेल, असं शेतकरी संघटनांना वाटत आहे. म्हणून त्यांनी सरकारच्या या धोरणाला विरोध केला आहे.


कोरोना काळात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. शेतमालाला भाव नाही आणि त्यात अजून त्यांच्या माथी हा शेअरचा बोजा टाकण्यात आल्याने शेतकरी सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. राज्य सरकारने सहकारी साखर कारखान्याना उभं करण्यासाठी हे धोरण आखलं आहे. परंतु याआधी देखील सरकारने या सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांची मदत करण्यात आली आहे. मात्र त्याचा उपयोग होण्याऐवजी कारखाने अधिकच अडचणीतच आले आहेत. त्यामुळे या नव्या मदतीचा कारखान्यांना कितपत मदत होईल याबद्दल मात्र शंका आहे.