मुंबई : अनेक वर्षांपासून रखडलेली सरळ सेवा भरती आजपासून सुरू झाली आहे. आरोग्य विभागातल्या 56 पदांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सकाळी नऊ वाजताचा रिपोर्टिंग टाईम देण्यात आला आहे. मात्र दापोली इथल्या वराडकर सेंटरमध्ये आज सकाळी विदर्भ आणि मराठवाड्यातून आलेल्या 650 विद्यार्थ्यांची परीक्षा होणार होती. परंतु वेळ होऊनही हे केंद्र बंद असल्यामुळे परीक्षार्थ्यांनी तिथे गोंधळ केल्याची माहिती मिळाली आहे.


आरोग्य विभागाच्या 56 पदांसाठी भरती प्रक्रिया करत असताना एकाच उमेदवारांनी अनेक पदासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु अशा उमेदवाराला ज्या वेळेला प्रवेश पत्र मिळाली त्यावरून बराच गोंधळ झाला होता. आज सकाळी नऊ वाजता ज्या वेळेला हे उमेदवार परीक्षा केंद्रावर ती आले तिथे त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सॅनिटायझर आणि ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे.


राजेश टोपेंनी दिल्या शुभेच्छा


परीक्षेपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका पत्राद्वारे परीक्षार्थींना शुभेच्छा देत आवाहन केलं होतं. टोपे यांनी एका पत्राद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छापर संदेश दिला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींना माझ्या शुभेच्छा ! विविध पदांसाठी ही भरती होत असून केवळ गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे, फक्त गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांन केलं होतं.


आरोग्य विभागाने 2019 मध्ये 56 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते. अनेक उमेदवारांनी 5 ते 6 पदांसाठी अर्ज केले होते. कोरोना कालावधीत या विभागाकडून जाहिरात निघाली नाही, त्यामुळे परीक्षाही घेण्यात आल्या नव्हत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने जाहिरात काढून परीक्षेची भरतीप्रक्रिया राबवली. त्यानुसार, आज रविवार 28 फेब्रुवारी रोजी राज्यभरात 5 हजार जागांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे.


दोन जिल्ह्यातील परीक्षा केंद्रामुळे घोळ
उमेदवारांना दोन पदांसाठी अर्ज करता येईल असे सांगण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला. परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरी बदलण्याची मुभा दिली होती. काही विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज केला परंतु राज्य सरकारने कंपल्सरी अशा विद्यार्थ्यांना दोनच पदांसाठी परीक्षा देण्यासाठी हॉल तिकीट वितरीत केले होते. मात्र या हॉल तिकिटावर एखादा विद्यार्थी सकाळी मुंबईला परीक्षा देत असेल तर त्याच विद्यार्थ्याला औरंगाबाद मध्ये दुपारी दुसऱ्या पदासाठी परीक्षा द्यावी लागणार असल्याचा प्रकार समोर आला होता.